हे आहे मिलिंद सोमणच्या फिटनेसचं सिक्रेट!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फिटनेसवर देशातील अनेक खेळाडू, सेलिब्रेटी यांच्याशी चर्चा केली. ‘फिट इंडिया संवाद’ अंतर्गत करण्यात आलेल्या या चर्चेत नरेंद्र मोदींनी अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमणशीदेखील गप्पा मारल्या.
“तुझं वय तू काहीही सांगितलंस तरी खऱंच इतकं जास्त आहे का? की दुसरी काही गोष्ट आहे,” असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला. यावर मिलिंद सोमणनेही हसून उत्तर दिलं की, “अनेकजण मला तुझं वय खरंच ५५ आहे का असं विचारतात. या वयातही मी ५०० किमी कसं काय धावू शकतो याचं त्यांना आश्चर्य वाटतं. मी त्यांना सांगतो की, माझ्या आईचं वय ८१ वर्ष आहे आणि मी जेव्हा ८१ वर्षांचा होईन तेव्हा तिच्यासारखंच व्हायचं आहे. माझी आई माझ्यासाठी आणि इतर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे”.
नरेंद्र मोदींनी यावेळी कौतुकाने मिलिंद सोमणचा उल्लेख ‘मेड इन इंडिया मिलिंद’ असा केला. नरेंद्र मोदींनी मिलिंद सोमणला आपण त्याच्या आईचा पुश-अप करतानाचा व्हिडीओ पाच वेळा पाहिला होता अशी आठवणही सांगितली. तो व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित झाल्याचं ते म्हणाले.