बॉबीच्या क्लासमध्ये मराठमोळा विद्यार्थी ...!
Updated: Aug 21, 2020
नेटफ्लिक्सकडून लवकरच एक नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहे "क्लास ऑफ 83"! नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक मराठमोळा चेहराही दिसत आहे. कोण आहे हा मराठमोळा चेहरा? चला पाहूया.
वायझेड, बघतोस काय मुजरा कर, मुळशी पॅटर्न, पोश्टर गर्ल, अश्लील उद्योग, सातारचा सलमान अशा बऱ्याच सुपरहिट चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आणि चित्रपट तसेच नाट्यक्षेत्रातही यशस्वी वाटचाल करणारा हा अभिनेता म्हणजे अक्षय टंकसाळे. वायझेडमधला कूल डूड बत्तीस असो, किंवा मुळशी पॅटर्नमधल्या इंस्पेक्टरचा बिघडलेला मुलगा, पोश्टर गर्लमधल्या रमेश-सुरेश या जोडगोळीमधला रमेश या सगळ्याच भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. वायझेड चित्रपटात त्याने रंगवलेला बत्तीस लोकांच्या मनाला भिडला, पटला आणि प्रचंड आवडला. आपल्या अभिनयाच्या जोरावर हा मराठी मुलगा आता नेटफ्लिक्सवरही झळकतो आहे. शाहरुख आणि गौरी खान निर्मित नेटफ्लिक्स ओरिजनल आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट यांच्या "क्लास ऑफ 83" या आगामी चित्रपटात तो एका महत्वाच्या भूमिकेत अक्षय आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
आत्तापर्यंत आपल्याला अक्षय हसरा, खेळकर, खट्याळ मुलाच्या, कूल डूडच्या भूमिकेत आपल्याला दिसला आहे. पण या चित्रपटात मात्र तो आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल अक्षय म्हणतो," या चित्रपटात मी खलनायकी भूमिका करत आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपैकी ही भूमिका खूप वेगळी आणि खूप काही शिकवणारी आहे. ग्रे शेड असलेली ही भूमिका आहे. ही भूमिका करताना, या सगळ्या लोकांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मसाठी काम करणं , चित्रपटक्षेत्रातल्या दिग्गज आणि मातब्बर लोकांसोबत काम करणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट जरूर पाहावा."
विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत "एबी आणि सीडी " या चित्रपटातही त्याने काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यसृष्टीतही अक्षयने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता हा मराठी मुलगा हिंदी चित्रपटसृष्टी तसेच वेबच्या क्षेत्राकडेही यशस्वी वाटचाल करत आहे. त्याच्या या चित्रपटासाठी आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services